शनिवार, १३ जून, २०२०

      प्रधानमंत्री किसान निधी सन्मान योजनेंतर्गत
215 कोटी 48 लक्ष 94 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा
क्यार वादळामुळे नुकसान झालेल्या 5 लाख 19 हजार शेतकऱ्यांना
429 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा
                   फेसबुकलाईव्हमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड यांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी यासाठी डिसेंबर 2019 मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातुन आतापर्यंत 215 कोटी 48 लक्ष 94 हजार एवढी रक्कम जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी  फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधताना दिली.
दि. 13 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती, फेरफार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच टंचाईच्या उपाययोजना याविषयावर अधिकाऱ्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी तहसिलदार प्रशांत पडघन यांची उपस्थिती होती. 
नैसर्गिक आपत्ती, फेरफार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भात माहिती देताना निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड म्हणाले, प्रधानमंत्री किसान निधी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी  सहा हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येते.  जालना जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाख 83 हजार 141, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख 88 हजार 505, तिसऱ्या टप्प्यात 2 लाख 23 हजार 966, चौथ्या टप्प्यात 1 लाख 82 हजार 174 तर पाचव्या टप्प्यामध्ये 99 हजार 661 असे एकुण 215 कोटी 48 लक्ष 94 हजार एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.  परंतु आधारक्रमांक चुकीचा असणे, खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक चुकीचा असणे अशा अडचणीमुळे त्यांना लाभ मिळालेला नाही. अशा लाभार्थ्यांनी तालुकास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मदतकक्षाच्या माध्यमातुन त्रुटींची पुर्तता करुन घ्यावी.  जेणेकरुन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे शक्य होईल.  अंबड तालुक्यामध्ये मदतनीस म्हणून विजय भांडवले यांची नियुक्ती करण्यात आली असुन मो. क्र. 8605775854, बदनापुर तालुक्यासाठी सनी कांबळे-8263948844, भोकरदन तालुक्यासाठी सतीष काकडे-7588089052, घनसावंगी किशोर थोरात-9511774055, जाफ्राबाद अनिल चुंगडा-9420359492, जालना तालुक्यासाठी  शाम गुंजाळ -8830633212, मंठा सुभाष कुलकर्णी-9730713847 तर परतुर तालुक्यासाठी मदतनीस म्हणून निवृत्ती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांचा मोबाईल क्रमांक 7875222627 असा असल्याची माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड यांनी यावेळी दिली.
गत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्यार वादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.  या नुकसानीपोटी जिल्ह्यातील 5 लाख 19 हजार शेतकऱ्यांना 429 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर तीन टप्प्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे.  तसेच या नुकसानीच्या मदतीपासुन वंचित राहिलेल्या 42 हजार 497 शेतकऱ्यांसाठी  31 कोटी  97 लाख 89 हजार 798 रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली असुन निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करण्यात आले असुन 18 कोटी 27 लाख रुपयांची मागणीही शासनाकडे नोंदविण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  
जालना जिल्ह्यात डीडीएम (डॉक्युमेंट डिस्ट्रीब्युशन मॉडयुल) प्रणालीमधुन 5 लाख 58 हजार  863 सातबारा,  4 लाख 88 हजार 204 8-अ, 36 हजार 549 फेरफार असे एकुण 10 लाख 83 हजार 616 ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती देत नागरिकांनी विचारलेल्याप्रश्नांची उत्तरेही श्री गायकवाड यांनी यावेळी दिली.
टंचाईच्या अनुषंगाने माहिती देताना कार्यकारी अभियंता श्री डाकोरे म्हणाले, ऑक्टोबर ते जुन दरम्यान टंचाई उपायोजनांचा आराखडा तीन टप्प्यामध्ये तयार करण्यात येतो. जालना जिल्ह्यात 1 हजार 111 गावे आणि 144 वाड्यांचा समावेश असलेल्या एकुण 1 हजार 354  उपाय योजनांसाठी आराखडा प्रस्तावित करण्यात आल्या होता.  त्यास मंजुरी मिळुन कामे प्रगतीमध्ये आहेत.  जिल्ह्यात  नळयोजना विशेष दुरुस्ती 102, तात्पुरती पुरक योजना 43 उपाययोजना प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  जिल्ह्यात मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला असुन आजघडीला जालना तालुक्यात 05, बदनापुर-17, जाफ्राबाद-05, मंठा-05, अंबड-17 तर घनसावंगी येथे 01 अशा एकुण 50 टँकद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असुन जिल्ह्यात 101 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असुन यामध्ये जालना येथे 11, बदनापुर-20, जाफ्राबाद-15, मंठा-9 अंबड-17 तर घनसावंगी येथे 29 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहितीही श्री डाकोरे यांनी यावेळी दिली.  यावेळी उपअभियंता नरेंद्र भुसारे, आर.के. राठोड उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...