शुक्रवार, १५ मे, २०२०

बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले



मुंबई,ब्युरोचीफ :- बीड मधील केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून पारधी समाजातील एकच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या तिहेरी हत्याकांडाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे. पारधी समाजातील तीन जणांची  शेती च्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या तिहेरी हत्याकांडाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत बीड चे  जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी त्याच प्रमाणे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी आपण संपर्क साधणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे याप्रकरणाकडे लक्ष ठेऊन असून बळीत कुटुंबाची रिपाइं चे तालुका अध्यक्ष  दीपक कांबळे तसेच  गौतम बचुटे; बाळासाहेब ओव्हाळ या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी  तात्काळ भेट घेतली आहे. अन्यायग्रस्त पारधी समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा असून गरीब शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी शोषित समुहाला  रिपब्लिकन पक्ष कायम साथ देत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे. 

               

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग लागल्याने जेन्टस पार्लर व पानटपरी जळून खाक.



मोबाईल शॉपी व जनरल स्टोअर्सचे ही मोठे नुकसान.



जाफराबाद/ प्रतिनिधी :- तालुक्यातील टेंभुर्णी येथे मंगळवारी मध्यरात्री विद्युत खांबावर झालेल्या स्पार्किंगमुळे लागलेल्या आगीत जेन्टस पार्लर व पानटपरी जळून खाक झाली असून, मोबाईल शॉपी व जनरल स्टोअर्सचे ही मोठे नुकसान झाले आहे.

     सविस्तर माहिती अशी की, टेंभूर्णी बस स्थानक परिसरातील साई जेन्टस पार्लर मागे असलेल्या विद्युत खांबावर मध्यरात्री स्पार्किंग होऊन त्याचे गुल पत्रावर पडले. पत्रावर झाडाचा पालापाचोळा पडलेला असल्यामुळे आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण करून येथील अरुण जाधव यांचे साई जेन्टस पार्लरला कवेत घेतले. यातील महागड्या खुर्च्या, फर्निचर, फॅन, इन्व्हर्टर व महागडी लोशन क्रिम अशा अडीच लाखाच्या वस्तु जळून खाक झाल्या. तसेच यांच्या बाजूला खेटूनच असलेल्या तस्लिम पठाण यांच्या पानटपरीतील फ्रिज व अन्य वस्तु असा ३५ हजारांचा ऐवज तर जाकेर पठाण यांच्या मिलन मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल, जनरल वस्तु व फर्निचर असा अडीच ते तीन लाखांचा माल जळून खाक झाला आहे. सुरेश साळुंके यांच्या व अन्य एका टँकर मधील पाण्याद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न यावेळी उपस्थितांनी केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते.
     तलाठी राम धनेश व पोलीस जमादार श्री. गवळी यांनी (दि. १३) बुधवार रोजी पंचनामा केला.

 प्रतिक्रिया :-
-----------------------------------
२२ वर्षा पूर्वी ही आगीने नुकसान.

अरुण जाधव यांच्या जेन्टस पार्लरला २२ वर्षा पूर्वी नोव्हेंबर १९९८ ला ही आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. आता पुन्हा स्पार्किंगमुळे आग लागून संपूर्ण दुकान बेचिराख झाल्याचे सांगताना ते भावुक झाले होते. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन असल्यामुळे २ महिन्यापासून सर्व दुकाने बंद असल्यामुळे आर्थिक कोंडी झालेली आहे. लॉकडाऊन संपल्यावर नव्या उमेदीने दुकाने सुरू करू या आशेवर असणार्या दुकानदारांची पार निराशा झाली आहे. स्पार्किंगमुळे आमच्या व्यवसायाचे होत्याचे नव्हते झाले असून प्रशासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी अरुण जाधव, जाकेर पठाण व तस्लिम पठाण यांनी केली आहे.
-----------------------------------

वरखेडा विरो येथे वीज पडून बैलजोडी मुत्युमुखी.



जाफ्राबाद,प्रतिनिधी:- तालुक्यात दि. १३ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जोरदार मेघगर्जनेसह पाऊस झाला, पावसाबरोबरच वारा व विजेचा कडकडाटही जोरदार होता. या पावसातच तालुक्यातील वरखेडा विरो येथील शेतकरी दिनकर भाऊराव तायडे यांची बैलजोडी शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेली असतांना वीज पडून जागेवरच मुत्यूमुखी पडली असून तायडे यांचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या तोडांवर बैलजोडी मेल्याने तायडे यांच्या समोर संकट निर्माण झाले असून त्यांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी तेथील शेतकरी गजानन उबाळे, दत्तु उबाळे, राम उबाळे यांनी केली आहे.

*अंबडसह विविध ठिकाणी वाऱ्यासह पाऊस व विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पावसाने बठाण परिसरात नुकसान*


शहरातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाऊसाणे लावली हजरी मोसंबी, डाळिंब, आंबा, द्राक्षे फळबागांना फटका


*अंबड़/अरविंद शिरगोळे* : अंबड शहरामध्ये मुसळधार पाऊस शहरसह आणि ठिकठिकाणी गुरुवारी ता.14 ढग दाटून आले. त्याचबरोबर ढगांचा गडगडाट पाऊस विजांचा कडकडासह पावसाने हजेरी लावली. शहरातील तालुक्यातील  धनगर पिंपरी, मठ पिंपळगाव हरतखेडा, शेवगा, नागझरी, आलमगाव, संभारवाडी, हस्तपोखरी, मार्डी, लालवाडी सह आदी ठिकाणी पाऊस पडला. काटखेडा येथे वादळवाऱ्यामुळे अमृता जाऱ्हाड व रमेश जाऱ्हाड यांच्या शेतातील सौर ऊर्जेसाठी लावलेले  पॅनल, पाट्या व आदि साहित्य दुरवरुन उडून गेल्याने मोठे नुकसान झाले  चांभारवाडी परिसरात झाडेउडून पडले आहे. तसेच तालुक्यातील  बटन व काटखेडा परिसरात बुधवारी ता.13 वादळवाऱ्या ने तसेच जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात घरातील शेतात जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले आहे. तसेच घराच्या भिंती सुद्धा पडल्या सोलर पॅनल उडून गेले  गांव व शेताशिवरातील विजेचे पोल जमिनीकडे झुकले गेले आहे. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या तसेच संदीप लिहिणार यांच्या घरावरील पत्रे उडून गेले यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवहानी झाली नाही वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने विजपंप, पिठाची गिरण्या बंद पडले आहे. मोसंबी, डाळिंब, आंबा, द्राक्षे फळबागांना फटका बसला आहे भयंकर पावसामुळे शेतातील शेतकरीचे खूप मोठं नुकसान झालं आहे.

पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून कोविड मोटार सायकल, ड्रोन पेट्रोलिंगला सुरुवात

पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव होणार - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर




 नांदेड,प्रतिनिधी :- कोविड मोटार सायकल, ड्रोन पेट्रोलिंगला सुरुवात केल्यामुळे कोविड पेट्रोलिंगमुळे कंटेनमेन्ट झोनमध्ये लागणारा पोलीस बंदोबस्त कमी होवून पोलीसांवरील झोनचा ताण कमी होणार असून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणू संक्रमनातून बचाव होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 कोरोना विषाणूने पोलीस अधिकारी, कर्मचारी संक्रमित होवू नये या दृष्टीकोनातून नांदेड शहरातील कंटेनमेन्ट झोनमध्ये मोटार सायकलवर कोविड पेट्रोलिंगची  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करुन पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात आली आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन बोलत होते. 

यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले, या कोविड पेट्रोलिंगमुळे पोलीसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होणार असून ही मोटार सायकल कंटेनमेन्ट झोनमध्ये पेट्रोलिंगकरुन जनतेमध्ये कोरोना विषाणूसंदर्भाने जनजागृती करतील व कोणीही घराबाहेर निघणार नाही याबाबत पेट्रोलिंगदरम्यान लक्ष ठेवतील. कोविड पेट्रोलिंगसाठी प्रायोगिक तत्वावर सद्या 10 मोटार सायकली सुरु करण्यात आली असून लवकरच नांदेड शहरात कोविड पेट्रोलिंगसाठी सुसज्ज अशा एकूण 32 मोटार सायकली सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने कंटेनमेन्ट झोनमध्ये जनतेवर नजर ठेवून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांचे व्हिडीओ चित्रीकरण व फोटो काढणार आहे. कोविड पेट्रोलिंग व ड्रोनमुळे पोलीस दलावरील बंदोबस्ताचा ताण कमी होणार असल्याचे सांगितले आहे.

मोटार सायकल पेट्रोलिंगसोबतच कंटेनमेन्ट झोनमध्ये आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. नांदेड शहरातील पिरबुऱ्हाननगर, अबचलनगर, गुरुद्वारा परिसर व रहमतनगर, रविनगर कौठा, सिध्दार्थनगर करबला येथे कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळल्याने हे ठिकाणे व लगतचा परिसर महानगरपालीका आयुक्त यांनी पूर्णत: सील करुन कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.

नांदेड जिल्हयात कोरोना संक्रमित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. नांदेड शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची तसेच कोरोना विषाणूने पोलीस अधिकारी व कर्मचारी संक्रमित होवू नये या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे संकल्पनेतून नांदेड शहरातील कंटेनमेन्ट झोनमध्ये मोटार सायकलवर कोविड पेट्रोलिंगची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच मोटार सायकल पेट्रोलिंगसोबतच कंटेनमेन्ट झोनमध्ये आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाईल.

कोविड पेट्रोलिंग मोटार सायकलचे वैशिष्टय

ही मोटार सायकल पी. ए.सिस्टीम, लाईट, सायरन, फेस शिल्ड हेल्मेट, लाठी, हॅडग्लाव्हज, एन-95 मास्क, सॅनिटायझरसह सुसज्ज असून नांदेड शहरातील (6) पोलीस स्टेशन हद्दीतील कंटेनमेन्ट झोनमध्ये ही मोटार सायकल कार्यरत राहिल. मोटार सायकलवर दोन पोलीस कर्मचारी सतत पेट्रोलिंग करतील. पेट्रोलिंग दरम्यान पी. ए. सिस्टीमव्दारे नागरीकांना सतत कोरोना विषाणू आजाराबाबत जनजागृती करुन त्यांना घरातच राहणेबाबत कळवतील. 

अत्याधुनिक ड्रोनचे वैशिष्टय

नांदेड शहरातील कंटनेमेन्ट झोनमध्ये कोविड पेट्रोलिंगसोबतच आधुनिक असलेल्या ड्रोनच्या सहाय्याने लोकांवर नजर ठेवली जाईल. या ड्रोनमध्ये पी.ए.सिस्टीम, अत्याधुनिक कॅमेरा आहे. ड्रोन हा विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांचे व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रे काढून कोविड पेट्रोलिंगला लागलीच कळविणार आहे.

कोविड मोटार सायकल पेट्रोलिंगच्या मोटार सायकली तयार करण्यासाठी पोलीस निरीक्षक मंगेश पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, धनंजय पाटील, सिध्देश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे, कर्मचारी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातुन  चोरटी वाळू जोमात; प्रशासन कोमात



नांदेड (भगवान कांबळे): - लॉकडाऊनच्या काळातही नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातुन बेकायदा वाळू वाहतुक सुरू असून विनापरवाना देशी व गावरान दारूची विक्री होत असल्याचा आरोप अनेक गावातली ग्रामस्थांनी केला आहे वाळू लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात चोरटी वाळू वाहतूक जोमात सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात वाळूची वाहतूक सुरू आहे. अशा अवैध वाळू वाहतुकीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सध्या वाळूचे दर ३२ ते ३५ हजार रुपये प्रतिट्रकपर्यंत गेले आहेत. देशात कोरोना ची महामारी सुरू असल्याने  यावर्षी वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे नवीन बांधकामे करताना वाळूची कमतरता भासू लागली आहे.काही वाळू व्यावसायिकांनी पूर्वी मारलेल्या ठिय्यांतूनच आता जास्त  भावाने  वाळू विक्री होत आहे. त्यासाठी वाळूचा दर मात्र चढा राहात आहे. सध्या जिल्ह्यात नऊ ते ११ हजार रुपये ब्रासप्रमाणे वाळूची विक्री होत आहे. वाळू वाहतुकीचे अंतर वाढल्यास त्या प्रमाणात दर वाढत आहे. धर्माबाद  तालुक्‍यात सर्वाधिक चोरटा वाळूउपसा होत आहे. ही वाळू नांदेड  जिल्ह्यासह हिंगोली  या भागात जात आहे. जिल्ह्यातील गोदावरी  नदीपात्रातून उपसा होणारी वाळू तेलंगणा राज्यात पाठविली जाते. त्यासाठीही जास्त दर घेतला जात आहे. वाढलेल्या वाळूच्या दरामुळे काहींनी पर्याय म्हणून दगडांची बारीक कच वापरली जात आहे. ही कच ही ब्रासला दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. ग्रामीण भागात वाळूअभावी बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे.

रस्त्यानी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी जालना महामार्ग वरील पारेश्वर  मंदिरात मजूर व रोजगार 24 तास अन्नदानाची व्यवस्था


पारनेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य बप्पासाहेब गोल्डे यांचा पुढाकार


अंबड /प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या जगभरात लॉकडाऊन सुरु असून परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील कामगार, विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने किंवा पाय-पायिच आपल्या गावाकडे निघाले आहे रस्त्यावरील हॉटेल बंद असल्यामुळे त्यांना जेवणाची मोठी समस्या भेडसावत आहे ही बाब लक्षात घेऊन अंबड महामार्गावरील हरतखेडा फाट्या जवळ  असलेले पारेश्वर मंदिरावर येणार्‍या जाणार्‍या लोकांसाठी 24 तास जेवणाची व्यवस्था परराज्यातील मजुरांना चहा,नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद सदस्य बप्पासाहेब गोल्डे व मित्र मंडळाच्या वतीने याबाबत पुढाकार घेण्यात आला पारेश्वर मंदिराच्या प्रांगणात सभागृहात मजुरांसाठी हा उपक्रम दैनंदिन सुरू आहे या साठी शेवगा येथील सरपंच  नानासाहेब शेरे, गणेश शेरे, पांडुरंग गटकळ, अरुण हिरे, रामेश्वर ढवळे, सलीम बागवान, बाबुराव जिगे, आसाराम धांडे, लक्ष्मणराव मगर, राजेश जिगे, सोनाजी येडे, कचरे, धनंजय रसाळ यांनी मित्र मंडळाच्या वतीने आदींनी परिश्रम घेतले

एक हात मदतीचा, एक हात आधाराचा - सुरेश नंदिरे


मुंबई, ब्युरो चीफ :- जगभरात पसरलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी लॉक डाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही, भारतात टप्याटप्याने लॉक डाऊन वाढवण्यात आला. मात्र कोरोना रुग्णात कमी आलेली नाही उलट ते वाढतच आहे, लॉकडाऊन काळात लाखो मजूर बेरोजगार झाले, हातात काही काम नसल्याने ते गावी चालले आहेत, मात्र ज्यांची घर, कुटुंब या ठिकणी आहेत त्यांना मुंबईत थांबण्याशिवाय पर्याय नाही,मुंबई ही सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून परिचित आहे, 60 लाख नागरिकांच्या सुविधेसाठी असलेली महानगर पालिका आता सुमारे 2 कोटी नागरिकांना सुविधा देत आहे, त्यातील अनेकजण पालिकेला कर देखील भरत नाही. तरीही मुंबई थांबली नाही ती चालूच आहे, रात्रंदिवस. देशाला सर्वाधिक महसूल देणारी मुंबई आता थांबली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असल्याने ती रेड झोन मध्ये आली आहे. धारावी, सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या भागात मी पत्रकार म्हणून नेहमीच गेलो आहे, घराघरात या ठिकाणी लघुउद्योग चालतो, महिला या कामात पुढे आहे, धारावीला नावे ठेवणाऱ्या लोकांना हे देखील माहीत नाही की आशिया खंडात सर्वात मोठा लघुउद्योग याच ठिकाणी चालतो. मोठमोठ्या शोरूम मध्ये असणाऱ्या वस्तू धारावीत तयार होतात, आज ही धारावी थांबली आहे, 90 फिट, 60 फिट, कुंभारवाडा, लेबरकॅम्प सारे काही थांबले आहे, सर्वात मोठा कुंभारांचा व्यवसाय बंद झाला आहे. मडके, दीपावलीच्या पणत्या विविध मातीच्या वस्तू याच ठिकणी तयार होतात. आज या लोकांना आपल्या मदतीची गरज आहे. धारावीत फिरताना अनेकांनी मदत मागितली, मदत जमा करून ती दिली,  पण ती कमी पडत आहे, काही खाजगी रुग्णालयांना PPE किट, मास्क यांची गरज आहे, अनेकांना अन्न धान्यांची गरज आहे. याच धारावीत सर्वात मोठा गरीब वर्ग देखील आहे. अशीच मदत गोवंडी, चेंबूर या भागातील लोकांना आहे, वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रसिद्धी प्रमुख असल्याने अनेकांचे मदतीसाठी फोन येत असतात, शक्य तितकी मदत पक्षाने, कार्यकर्त्यानी केली आहे. आता तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. आपण काहीही मदत करू शकता, पैसे,धान्य, ppe किट, मास्क आपले 100 रुपये देखील अनेकांच्या पोटाचा आधार आहे, अनेक मजूर आजही मुंबईत अडकले आहेत. त्यांना देखील मदतीची गरज आहे. ज्यांना शक्य त्यांनी मदतीसाठी पुढे यावे, शक्य झाल्यास त्यांना संस्थे तर्फे मदत केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. मदत करणाऱ्यांनी 9867600300 पत्रकार, सुरेश नंदिरे या व्हाट्स असे आवाहन केले आहे. 

बदनापूर तालुक्यातील हालदोला येथे शंभुराजे ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी.


बदनापूर, प्रतिनिधी :-  १४ मे रोजी हालदोला येथे शंभुराजे ग्रुप वतीने संभाजी महाराज जयंती  साजरी करण्यात आली.सध्या देशभरामध्ये कोरोना च संकट वाढत चालले आहे .आणि जालना जिल्हा पण रेडझोन मधे आहे .त्यामुळे संभाजी महाराज यांची जयंती घरच्या घरीच दिवा लावून  महाराजांना अभिवादन केले.त्यावेळेस उपस्थित अशोक मात्रे,बबन मात्रे, योगेश मात्रे,विष्णु मात्रे,विजय मात्रे,ज्ञानेश्वर मात्रे,समाधान भालेराव.आदी उपस्थित होते.

पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या,आरोपींवर कठोर कारवाई करा - प्रकाश आंबेडकर


पुणे,(ब्युरो चीफ)  - जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या गावात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.जग एकीकडे कोरोनाशी लढतोय तर भारतात जातीवादी, धर्मवादी लोकांनी पुन्हा एकदा आपला क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या ठिकाणी पारधी समाजाचे पवार कुटुंब राहतात. यांच्या जमिनीवरून निंबाळकर कुटुंबाबरोबर वर्षानुवर्षे वाद चालू आहे. निंबाळकर कुटुंबांनी यापूर्वीही तीन वेळा पारधी समाजाच्या लोकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही किंवा त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले नाही. त्याचा फायदा आरोपींनी घेतला आणि पवार कुटुंबीयांवर काल रात्री  जीवघेणा हल्ला केला. त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आले. बाबू पवार, प्रकाश पवार त्याची पत्नी जादुई पवार  आणि संजय पवार यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.पारधी समाज हा लढाऊ समाज असून ब्रिटिशांविरुद्ध तो स्वतंत्र सैनिकासारखा लढला, मात्र ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगारी जमात ठरवून त्यांच्यावर तसा शिक्का मारून ते निघून गेले. आजही त्यांच्यावर तो शिक्का कायम आहे. त्यामुळे पारधी समाजाची मानसिकता पूर्णपणे मोडण्यास कारणीभूत ठरली. तरीही हा समाज आता नव्याने उभा राहतोय. सरकारी जमिनीवर स्वतःची उपजीविका करतोय. तो आता अभिमानाने जगायला लागला आहे ते इथल्या धर्मवादी, जातीवादी समाजाला पाहवले नाही आणि म्हणून त्यांनी या चार निष्पाप लोकांची निर्घुन हत्या घडवून आणली. या पूर्वीही या समाजवर हल्ला करण्यात आला  होता. त्याची दखल घेण्यात आली नाही. शासनाला विनंती आहे की, या निंबाळकर कुटुंबाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. उपसरपंचाला अटक करून सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अशी माहिती पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली दिली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...