रविवार, ७ जून, २०२०


                  शंकरनगर परिसर सील, दुकाने बंद



जालना/प्रतिनिधी :- जुना जालन्यातील शंकरनगर परिसरातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली. सदर व्यक्तीने ताप आल्यानंतर खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही स्वॅब घेण्यात आले होते. तपासणीअंती डॉक्टरांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तथापि, सदर डॉक्टर स्वत:हुन होम क्वारंटाईन झाले आहे. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे पाटील, पोलीस उपनिरीक्षक पोवार, स्वच्छता विभागप्रमुख संजय वाघमारे, स्वच्छता निरीक्षक पंडीत पवार, राजेंद्र जाधव आदींनी संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला. यावेळी बाधीत रूग्णाच्या कुटूंबांना क्वारंटाईन करण्यात आले असून शंकरनगरचा परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. परंतू त्याआधीच या भागातील दुकाने बंद करण्यात आली आहे. यावेळी स्वच्छता कर्मचारी रावसाहेब लोखंडे, कमलाकर सगट, किशोर सगट,  बळी पांडव, अग्निशामक विभाग प्रमुख विठ्ठल गोगरूड व कर्मचारी,आशा कर्मचारी निसर्गन आदींनी परिश्रम घेतले.


         

      
         पन्नास व्यक्तींच्या मर्यादेत लग्नसमारंभास   
                    मंगलकार्यालयांना मुभा.




नांदेड (भगवान कांबळे ) :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगलकार्यालयांवरील घातलेले निर्बंध शासनाने आता शिथिल केले असून 50 व्यक्तींना नियम व अटींच्या अधीन राहून लग्नसमारंभासाठी मुभा देण्यात आली आहे.
एकावेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालयात कर्मचारी व लग्नासाठी उपस्थित सर्व व्यक्तींची संख्या ही 50 पेक्षा जास्त असणार नाही. कोणताही आजारी व्यक्ती लग्न समारंभाला येणार नाही यासह आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करुन कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत.
लग्न समारंभासाठी लोकांची गैरसोय व कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निश्चित केलेले नियम व अटीचे उल्लंघन होणार नाहीत याची दक्षता घेऊन नांदेड जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना मुभा देण्यात आली आहे.
समारंभात सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे लागेल. लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तींची तपासणी करुनच प्रवेश देणे बंधनकारक राहील. याठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व  मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमित निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक आहे. लग्न समारंभ सकाळी 9 ते सायं. 5 या कालावधीत करणे तसेच लग्नसंमारंभाची पूर्ण प्रक्रिया 5 ते 6 तासाच्या आत संपविणे बंधनकारक असेल. सर्वांना पुरेल या प्रमाणात सॅनिटायझरचा साठा असावा. कोणताही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येणार नाही. अशा ठिकाणी 55 वर्षावरील जेष्ठ नागरिक, ज्यांना मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर माता व दहा वर्षाखालील मुलांना शक्यतोवर प्रवेश टाळावा. लग्नामध्ये येणाऱ्या लोकांची यादी इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांना सादर करावी. ही यादी लग्नाच्या अगोदर सादर करावी व त्यामध्ये लग्नाला येणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते असणे आवश्यक आहे. मंगल कार्यालयाच्या आवारात थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावे. ही जबाबदारी मंगल कार्यालय मालक यांची राहील.
या अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास अशा मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. संबंधीत आस्थापना चालकाविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून कारवाई करण्यात येईल.
या आदेशात नमूद संपूर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात आले आहे. महानगरपालिका हद्दीत- महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाने संयुक्त पथक गठीत करावे.वरील सर्व संबंधीत यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकांचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांच्याकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander)  यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणांची जबाबदारी असेल. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.


 जिल्ह्यात 14 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर           26 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन
        डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.



जालना,ब्युरोचीफ :- जाफ्राबाद शहरातील तीन, संभाजीनगर, जालना येथील एक, काद्राबाद, जालना येथील एक, शंकरनगर, जालना येथील एक, बालाजीगल्ली आफसा मज्जीद परिसर, जालना येथील एक, यावलपिंप्री ता. घनसावंगी येथील एक, पांगरा ता. घनसावंगी येथील तीन, राजेगाव ता. घनसावंगी येथील तीन अशा एकुण 14 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे तर काटखेडा ता. अंबड येथील पाच, शारदानगर, अंबड येथील पाच, मठपिंपळगाव ता. अंबड येथील सहा, रोहिणा ता. परतुर येथील एक, नुतन वसाहत,जालना येथील चार, ढोरखेडा ता. जालना येथील एक, ढोरपुरा, जालना येथील एक, नुतनवाडी ता.जालना येथील एक व पुष्पक नगर, जालना येथील दोन अशा एकुण 26 रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर त्यांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने या सर्वांना आज दि. 7 जुन, 2020 रोजी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जाफ्राबाद शहरातील रहिवाशी असलेल्या 52 वर्षीय पुरुष दि. 5 जुन, 2020 रोजी अस्थमा व श्वसनाचा विकार असल्या कारणाने ग्रामीण रुग्णालय, जाफ्राबाद येथे दाखल झाला होता.तेथुन दि. 5 जुन रोजी रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे संदर्भीत करण्यात येऊन अत्यावस्थ परिस्थितीमध्ये आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना सदरील पुरुषाचा दि. 5 जुन रोजी मृत्यू झाला असुन मृत्यूनंतर सदरील रुग्णाच्या स्वॅबचा अहवाल दि. 6 जुन, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -2941 असुन सध्या रुग्णालयात -61 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1152, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या - 45 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3143, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–14 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -199, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -2886, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-372, एकुण प्रलंबित नमुने -54, एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1086,
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –986 , आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -24, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -488, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–08,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-61, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -41, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-26, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -114,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 75 (+ दोन रेफर औरंगाबाद व 3 एमजीएम, औरंगाबाद येथे भरती), पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 5940 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 05 एवढी आहे.  कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 488  व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-00,डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -30, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -210, कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह परतुर  -11, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-10, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद- 01, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद-00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -00 शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-22, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –48, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र.2-00, मॉडेल स्कुल मंठा-40, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -10, कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह, मंठा-15, मॉडेल स्कुल अंबारोड, परतुर-26 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 160 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 757 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 821 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 22 हजार 30 असा एकुण 3 लाख 48  हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझीटिव्ह           व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय आरोग्य                        विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर.



मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.
गृह विलगीकरणासाठी काय करावे लागेल..
त्यासाठी सदर रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाला अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणीत करणे आवश्यक आहे.ज्या रुग्णाला घरी विलगीकरण (आयसोलेशन) करायचे आहे त्याच्यासाठी तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गृह अलगीकरणाची (होम क्वारंटाईन) सोय असणे आवश्यक आहे.या रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी.काळजी घेणारी व्यक्ती आणि त्या कुटुंबातील सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी.मोबाईलवर आरोग्य सेतू कार्यान्वित असणे आवश्यक आहे.सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास रुग्णाबाबत माहिती देणे अनिवार्य आहे.गृह विलगीकरणाविषयी प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर त्या व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.
वैद्यकीय मदत कधी घ्यावी..
काळजी घेणाऱ्या व्यक्तीने रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष दयावे.रुग्णाला धाप लागली, श्वासोच्छावासास अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये सतत दुखत असेल, शुद्ध हरपत असेल, ओठ, चेहरा निळसर पडला असेल अश लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
गृह विलगीकरण कधीपर्यंत..
गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसांनंतर. मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर त्या व्यक्तीला गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्याचा हा गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
                        नागपूर खून प्रकरण; प्रकाश आंबेडकरांचा पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप,
                                              तपास अधिकारी हटविण्याची मागणी !



नागपूर,ब्युरोचीफ :- नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असतांना पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असलेला आरोपी मिथिलेश उमरकर यास वाचविण्यासाठी हत्येच्या प्रकरणाला राजकीय दबावापोटी आत्महत्येचे स्वरूप देण्यात येत आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप केला जात  आहे.२७ मे रोजी थडीपवनी येथे अरविंद बनसोड आणि त्याचे दोन सहकारी बँकेत पैसे काढायला गेले होते.  एचपी गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बनसोड यांचा सहकारी एजन्सीच्या  बोर्डाचा फोटो काढत होता. फोटो काढतांना  'फोटो का काढतो?' म्हणून एजन्सीतील गुंडांनी त्यांचा मोबाईल हिसकावला. मोबाईल घेण्यासाठी अरविंद आत गेला, तर तिथे एजन्सीचा मालक मिथलेश उमरकर बसलेला होता, त्याने अरविंदला जातिवाचक शिवीगाळ आणि जीवेमारण्याची धमकी देत गुंडांसोबत मिळुन मारहाण केली आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. अरविंद मोबाईल मागत असताना उमरकर व त्याचे गुंड त्याला मारहाण करीत राहिले, अरविंद बाहेर आला आणि सहकार्यांना येथून जा म्हणाला, त्याचे सहकारी थोडे बाजूला गेले. अरविंद पुन्हा गेला, मोबाईल द्या म्हणाला, त्यांनी यावेळी दोन्हीही मोबाईल घेतले आणि परत अरविंदला मारहाण केली.  अरविंद परतला नाही म्हणून थोड्या वेळाने सहकारी तेथे गेले असता अरविंद गॅस एजन्सीच्या पायरीवर पडलेला दिसून आला. जवळच कीटकनाशकाची बाटली दिसून आली. घटनास्थळी लोक जमा झाले म्हणून आरोपी मिथलेश उमरकरने अरविंदला  गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन गेले. जाताना कीटकनाशकाची बाटली घेऊन गेले. पुन्हा गाडीत त्याच्यासोबत काय झालं हे कोणालाच माहीत नाही. अशी माहिती अरविंदच्या सहकाऱ्यांनी दिली.


          अरविंद बनसोडने विष पिऊन आत्महत्या केली यावर अरविंदचे सहकारी मित्र व भाऊ यांचा विश्वास नाही. अरविंदची हत्या करण्यात आली असल्याची दाट शक्यता दिसत असतांना पोलसांनी आत्महत्या म्हणून या प्रकरणाची नोंद केली आहे. अरविंद  स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता आणि सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून गोरगरीब जनतेचे काम करायचा. एक दलित कार्यकर्ता व्यवस्थेला प्रश्न का विचारतो ? या रागातून त्याची सुनियोजित कट करून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप अरविंदच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे.आरोपीचे वडील बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तर आरोपी राष्ट्रवादीचा युवा नेता पंचायत समिती सदस्य आहे. तसेच आरोपी मिथिलेश उमरकर हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आरोपीस वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव टाकुन प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहे. या प्रकरणात किरकोळ ३०६, ३४ कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही बाब फार चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून  कारवाई करावी. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एक निवेदन देण्यात आले असून त्यात दिलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. जातिवाचक शिवीगाळ व सार्वजनिक ठिकाणी अवहेलना करण्याबाबत "अट्रॉसिटी (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९)" अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. ही हत्या असल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. घटनास्थळी हजर असलेला मित्र 'गजानन राऊत' याला गाडीत येण्यास मज्जाव करून एकट्या 'अरविंद बनसोड'ला हॉस्पिटल घेऊन गेले. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी. हॉस्पिटलमध्ये नेताना गाडीत नेमका काय प्रकार घडला, याचा ही तपास करण्यात यावा. आरोपी मिथिलेश उमरकर आणि  मारहाण करणाऱ्या इतर लोकांवरही सहआरोपी म्हणून कारवाई करावी. मृत अरविंद यांच्या सोबतीला असलेला मित्र 'गजानन राऊत' प्रत्यक्षदर्शी असल्याने त्याचा जबाब नोंदवण्यात यावा. तो अद्याप घेण्यात आलेला नाही. पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत व एका सदस्याला सरकारी नोकरी दिली पाहिजे, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.आरोपी 'मिथिलेश ऊर्फ मयूर बंडोपंत उमरकर' याचे पंचायत समिती सदस्य पद रद्द करावे. तसेच स्थानिक जलालखेडा पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद असून राजकीय पार्श्वभूमीचा प्रभाव असल्याने सुरुवातीला तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. आठवडा होऊन देखील संबंधित आरोपींची साधी  विचारपूस व त्यांना अटक न केल्याने संबंधीत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अश्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तपास अधिकारी आणि नागपूरचे पोलीस अधीक्षक (SP) यांच्याशी बोलून माहिती घेतली. पोलीस अधीक्षक (SP) यांना सांगण्यात आले आहे की तपास अधिकारी योग्य नसल्याने या प्रकरणाचा तपास दुसऱ्या चौकशी अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, या मागणीला पोलीस अधीक्षक (SP) यांनी होकार दिला आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...