सोमवार, ४ मे, २०२०

लाॅकडाऊनच्या काळात अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम चालकांचे परवाने रद्द करा

अखिल भारतीय सेनेच्या नंदा पवार यांची मागणी.


जालना,प्रतिनिधी:-
 कोवीड १९या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अवैधरित्या मद्य विक्री व वाहतूक करणाऱ्या परमीटरूम मालकांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय सेनेच्या जालना महिला शहराध्यक्ष नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


  आज(ता.४) नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपरोक्त संदर्भात एक निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की,कोवीड१९या महामारीचा  फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात जालना शहरात आणि परिसरात परमीटरूम मालक -चालक अवैधरित्या मद्य विक्री करीत आहेत, शिवाय मद्यची अवैधरित्या वाहतूक करीत आहेत.लाॅकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू ,औषधी वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत.मद्य विक्री तर बेमुदत बंद आहे.अशा परिस्थितीत जालना शहरातील आणि परिसरातील परमीटरूम मालक-चालक अवैधरित्या मद्य विक्री करीत आहेत.गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने यासंदर्भात परमीटरूम मालक-चालक यांच्याविरोधात कारवाई केली आहे.वास्तविक पाहता अवैधरित्या मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे.मात्र या विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम मालक-चालक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लागेबांधे आहे,हे यावरून सिद्ध होते.अवैधरित्या मद्य विक्री रोखण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारूच्या अड्डे उध्दवस्त केले.जालना शहरात लाॅकडाऊनच्या काळात परमीट रूम फोडून तेथून मद्याचे बाॅक्स चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत.हा परमीटरूम मालक-चालक यांनी केलेला बेबनाव आहे,मद्याच्या बाटलीवरील पॅकींग नंबरची चौकशी केली तर यामागील सत्य बाहेर येईल.जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करून अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम मालक-चालक यांच्याविरोधात कारवाई करावी तसेच त्यांचे परवाने रद्द करून या मंडळींना पाठीशी घालणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची  चौकशी करावी, अशी मागणीही नंदा पवार यांनी या निवेदनात केली आहे.


जिल्ह्यातुन परराज्यात, परजिल्ह्यात जाण्या  व येण्यासाठी आजपर्यंत 7 हजार 78 अर्ज प्राप्त
कागदपत्रांची तपासणी करुन निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु
जालना,प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने 5 हजार 369 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 1 हजार 709 असे एकुण 7 हजार 78 अर्ज प्राप्त झाले असुन अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन पुढील निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकानी ऑनलाईन पद्धतीने https:jalna.gov.in/mr/tofrmjalna/ या लिंकवर इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी अर्ज केले होते.  त्यांचे पास संबंधित तहसिल कार्यालयाकडे वर्ग केले असुन अर्जदारांनी संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन पास हस्तगत करुन घ्यावेत.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन नये.  तसेच जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून https://jalna.gov.in/tofromjalna/ तसेच पोलीस विभागाच्या प्रवासाचा परवाना मिळण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या लिंकवर माहिती भरावी. वरील दोनही प्रकारच्या परवानग्या बाहेर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक आहेत.  या परवानग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातील.  यासाठी कोणीही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करु नयेत.  तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करु नये अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. 
  जिल्ह्यात एकुण 1121 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 56 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 765 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 32 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1073 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1026, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 221, एकुण प्रलंबित नमुने-35 तर एकुण 709 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 19, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 421 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 15, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -275, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-17, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 56, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 19, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 230 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.   
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 275 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-24, पोलीस प्रशिक्षण केंद्र-119, परतुर-08, जाफ्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 469 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 80 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 540 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण तर 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जैन संघटना सामाजिक कार्यात अग्रेसर असते भाजपाचे ज्ञानेश्वर शेजुळ 

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- भारतीय जैन संघटना सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे गौरवोउद्गार जालना तालुका भाजपाचे मा.अध्यक्ष तथा जालना तालुका रो.ह.यो,चे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी आरोग्य तपासणी दरम्यान काढले आहे.भारतीय जैन संघटनेच्यावतीने नैसर्गिक आपत्ती,भुकंप,दुष्काळ व ईतर संकटाच्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात धाऊन जाऊन आर्थिक मदत करण्याचे काम अविरत चालु असल्याचे श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी म्हटले आहे.व या संघटनेच्यावतीने सध्या सेवली सर्कलमध्ये .डाॅक्टर आपल्यादारी.हा ऊपक्रम राबविण्यात येत आहे.काल भारतीय जैन संघटना,फोर्स मोटार्स व डाॅक्टर युनियनच्यावतीने जालना तालुक्यातील मौजे सोनदेव येथे कोरोना विषाणुवर मात करण्यासाठी गावात आरोग्य तपासणी करण्यात आली. गावातील अनेक रुग्णांना तपासण्यात आले व काहींना योग्य प्रमाणात गोळ्या व औषधी वाटप करण्यात आली.या वैद्यकिय पथकामध्ये सेवली येथील जैन संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश शेठ राका, जालना तालुका भा.ज.पा.चे मा.अध्यक्ष व रो.ह.यो.चे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शेजुळ,सेवली प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी ,मॅडम,डाॅ.मान्टे साहेब, डाॅ.नागरे साहेब,डाॅ.जोगड साहेब व डाॅ.किंगरे साहेब यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.गावात तपासणी दरम्यान सामाजिक अंतर व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीयांची वाट खडतरच
आरोग्य प्रमाणपत्रासाठी नांदेडमध्ये रांगा
आॅनलाईन फॉम भरताना अडचणी



नांदेड (भगवान कांबळे) :-  इतर राज्यातील तसेच इतर जिल्हयातील नागरीक, विद्यार्थी नांदेड जिल्हयात मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत़ या नागरिकांना त्यांच्या मुळगावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी यासाठीची प्रक्रिया किचकट असल्याने या नागरिकांची वाट खडतरच आहे़ सोमवारी आरोग्य तपासणीसाठी या नागरिकांनी श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती़
कोरोना रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकजण बाहेरील जिल्ह्यातील तसेच बाहेरील राज्यातील नांदेडमध्ये अडकलेले आहेत़  अशा नागरिकांना आप-आपल्या गावी जाण्यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी ँhttps://covid19.mhpolice.in हे  संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे़ या संकेतस्थळावर परीपुर्ण माहितीसह छायाचित्र व इतर आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करून माहिती नोंदणी केल्यानंतर संबंधीत अर्जदारास आॅनलाइन टोकण क्रमांक प्राप्त होणार आहे़ हा आॅनलाईन टोकन क्रमांक त्याच संकेतस्थळावरून डाऊनलोड पास या आॅपशनवर आपला टोकण क्रमांक नोंदवून पासची प्रिंट काढुन घ्यायची आहे़
या पास नोंदणीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळेच सोमवारी शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या़ ही रांग या रुग्णालयापासून वजीराबाद चौरस्तापर्यंत गेली होती़ परंतू सकाळी १० वाजेपर्यंतच तपासणी केल्यानंतर राहिलेल्या विद्यार्थी तसेच परप्रांतीयांना उद्या या म्हणून परत पाठविण्यात आले़ यामुळे अनेकांची निराशा झाली़ रांगा लावून ही तपासणी करुन घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीचे आव्हानही या नागरिकांसमोर उभे आहे़

ज्ञानेश्वर शेजुळ यांनी सॅनिटाझर व मास्क वाटप करून साजरा केला वाढदिवस.



जालना प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्येकर्ते जालना तालुका भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष व जालना रो.ह.यो. अध्यक्ष
श्री.ज्ञानेश्वर पाटील शेजुळ  यांनी कोरोना विषाणूच्या पाश्वभूमी  वर वारेमाप खर्चाची उधळपट्टी न करता सोनदेव गावातील गरजू नागरिकांना सॅनिटाईझर व माँस्कचे  वाटप करत अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.आज दि. ४ मे रोजी ज्ञानेश्वर शेजुळ  यांचा वाढदिवस होता गेल्या अनेक वर्षांपासून श्री शेजुळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर असते ग्रामिण भागातील जनतेवर भूकंप गारपीट अतिवृष्टी  सारखे प्रसंग सर्व सामन्यावर उधवल्यास ज्ञानेश्वर शेजुळ हे मदतीसाठी अग्रस्थानी असतात त्यांना सर्वं सामन्याची काळजी वाटत असते.त्या पाश्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत व शासनाच्या नियमांचे पालन करत आज शेजुळ यांनी आपल्या निवास स्थानी थांबनेच पसंत केले व जालना जिल्ह्यातील सर्व हितचिंतकांना सुद्धा  घरातच थांबण्याचे व सुरक्षित राहून कोरोना थांबण्याचे आवाहन करत श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केल्याने त्यांचे परिसरात स्वागत करण्यात येत आहे.


लॉकडाऊनसंदर्भात यापूर्वीचेच आदेश कायम राहणार
जिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार  - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना,प्रतिनिधी:- कोरोना विषाणुच्या अनुषंगाने राज्य शासनाने लॉकडाऊनसंदर्भात नवीन नियमावली जाहीर केलेली आहे.परंतु सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातुन तसेच कोरोनाविषाणुचे संक्रमण वाढू नये यादृष्टीने 
जालना जिल्ह्यात यापूर्वी निर्गमित केलेले आदेश कायम राहणार आहेत. जिल्ह्यातील जनतेला रोजगार मिळावा यादृष्टीकोनातुन औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरु करण्यात येणार असुन जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाने परराज्य, परजिल्ह्यातील व्यक्तींना आपल्या मुळगावी परत येण्यासाठी परवानगी दिलेली आहेत.  लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यातील अनेक व्यक्ती परराज्य, परजिल्ह्यातुन मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यातुनही व्यक्ती परराज्यात, परजिल्ह्यात जाणार आहेत.  कोरोनाचे संक्रमण वाढु नयेयासाठी जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी होऊन खात्री होणे गरजेचे असल्याने जिल्ह्यात यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत.  कृषिशी निगडीत तसेच अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने यापुर्वी देण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे सुरु राहणार असुन जिल्ह्यातील प्रत्येकाला सकाळी 7-00 ते दुपारी 2-00 या वेळेत पेट्रोल पंपावरुन इंधन उपलब्ध होणार आहे. 
जनतेला याबाबत काही शंका अथवा माहिती हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सचे पालन करावे,  तोंडाभोवती मास्क वापरावा, वैयक्तिक स्व्छता राखत साबनाने वारंवार हात धुवावेत. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा आपल्या घरातच रहावे. प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन जनतेने सहकार्य  करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...