रविवार, १० मे, २०२०

जाफराबाद तालुक्यात लॉकडाऊन मध्ये शेतकर्यांचे हाल....! तरीही जगाचा पोशिंदा राब राब राबतोय...!!

डावरगाव देवी ता. जाफराबाद येथील विष्णू बैनाडे यांचे कुटुंब मिरची लागवड करताना टिपलेले हे छायाचित्र.

जाफराबाद / प्रतिनिधी :- तालुक्यामध्ये गत वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. त्यानंतरही शेतकर्यांनी स्वतःला सावरत मका, गहू, ज्वारी, बाजरी, हरबरा, कांदा, लसूण, भाजीपाला, द्राक्ष, पपई, टरबुज, खरबूज यांसारखी उत्पादने घेतली. परंतु आता संपूर्ण जगात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने अक्षरशः थैमान घातलेले असल्यामुळे देशामध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वत्र वाहने, व्यापार, बाजारपेठ, विशेष म्हणजे गरीबांचे मार्केट अर्थातच आठवडी बाजार बंद असल्याने यात शेतकर्यांचे हाल होत आहेत.

शासनाने वेळेचे बंधन ठेवून व सोशल डिस्टंसींगचा वापर करून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी / विक्री करण्याची मुभा दिलेली आहे. तरी सुद्धा जाफराबाद, टेंभुर्णी, खासगाव अशा काही मोजक्या ठिकाणीच आठवडी बाजार भरत असून. तेथे गर्दीही कमी राहत आहेत. यामुळे बाजारात विक्री कमी होत असल्याने शेतकर्यांना जवळपासच्या गावांमध्ये जाऊन भाजीपाला व फळे विक्री करावे लागत आहे. येथेही कोरोनाच्या धास्तीने अनेकजण खरेदी करण्यास घाबरत आहेत. यातही समाधान कारक विक्री होत नसल्याने शेतकर्यांची दैना होत आहे. शिवाय लॉक डाऊन पूर्वी मका ला प्रति क्विंटल दोन हजार रु. पेक्षाही जास्त भाव होते, आता व्यापारी हजार / बाराशे रु. प्रति क्विंटल भावाने खरेदी करीत असल्याने शेतकरी द्विधा मन स्थितीत आहेत. याच बरोबर गहू, ज्वारी, बाजरी, हरबरा या मालाला ही योग्य भाव नसल्याने ते ही पडून आहेत.

     शेतांमध्ये हरीण व माकडे, पिकांची व भाजीपाला, फळावळांची नासधूस करीत असल्याने शेतकर्यांना दिवस-रात्र त्यांची राखण करावी लागत आहे. याशिवाय पुढील महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असल्यामुळे शेतांची नांगरटी व मशागत करून ते खरीप पिकांसाठी शेत तयार करीत आहेत. आता रासायनिक खते व बी-बियाण्यांसाठी पैशे कुठून आणावे? हा मोठा यक्ष प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
     एक विशेष...!
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जग मात्र थांबलेले आहे, तरीही हा जगाचा पोशिंदा राब राब राबतोय...!!

-----------------------------------  
     जाफराबाद तालुक्यातील आमच्या प्रतिनिधीने लॉकडाउन काळातील समस्या जाणून घेण्यासाठी अनेकांशी संपर्क साधले असता येथील शेतकरी, भाजीपाला-फळे विक्रेते, भूमिहीन मजूर, कलावंत व प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

"आम्ही कामानिमित्त औरंगाबाद ला असतो. सध्या लॉकडाऊन मध्ये गावातच असून, आई-वडिलांना परिवारांसह शेती कामी मदत करीत आहोत. शेतकर्यांना किती हालअपेष्टा सोसावे लागते, याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतोय. शासनाने शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव देऊन, सर्वतोपरी सहकार्य करावे. तरच त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल व देशाची उज्जवल भविष्या कडे वाटचाल होईल."
- विष्णू बैनाडे (प्रतिष्ठित नागरिक) डावरगाव देवी ता. जाफराबाद.
********************************************
"बाजारांमध्ये ४ वाजे नंतरच ग्राहकांचा ओघ वाढतो, मात्र शासनाने २ वाजे पर्यंतचीच वेळ दिल्याने समाधान कारक विक्री होत नाही. यात २०० रुपये सुद्धा हाती पडत नाही. आसपासच्या गावांत गेलो तर पेट्रोल खर्च ही निघत नाही. सध्या रमजानचा पवित्र महिना चालू असल्याने शासनाने बाजाराला दुपार नंतरची वेळ द्यावी."
- बालाजी मुळे (भाजीपाला व फळे विक्रेते.) टेंभूर्णी ता. जाफराबाद.
***********************************************
"अति पावसामुळे आमच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होते. आता लॉक डाऊनमुळे मका, कांदा व भाजीपाला यांना योग्य भाव मिळत नाही. आज रोजी मका चे भाव फक्त हजार रु. प्रति क्विंटल असल्याने शेतकरी बिकट अवस्थेत आहे.
     शासनाने याकडे लक्ष द्यावे व सहकार्य करावे."
- अनवर पठाण (सामान्य शेतकरी) गोंधनखेडा ता. जाफराबाद.*
***********************************************
"कोरोना व्हायरसमुळे आपल्या देशावर जे संकट आलेले आहे, त्यावर मात करण्यासाठी सरकारने घेतलेली महत्वाची भूमिका म्हणजे 'लॉकडाऊन'.
     परंतु यामध्ये जे 'भूमिहीन मजूर' पोट भरण्यासाठी गावातून शहरांत गेले होते, ते कोरोनाच्या भीतीने गावाकडे परतत आहेत. आता त्यांच्या पोटापाण्याचे काय?
     शासनाने भूमिहीन मजूरांसाठी काही तरी सोय करावी. हीच आमची विनंती आहे."
- अनिल चौधरी (भूमिहीन मजूर) देऊळ झरी ता. जाफराबाद.
***********************************************



"यावर्षी आम्ही खरबूज लागवड केली आहे. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मालाचे नुकसान होत असून त्याचा खर्च पण निघत नाही. आणि आता काही दिवसांनी पेरणीचे दिवस येणार आहे. तर सरकारने शेतकर्यांचे कर्ज माफ करून नवीन कर्जाची लवकरात लवकर वाटप करावी. जेणेकरून शेतकर्यांना आधार मिळेल."
.- समाधान पाटील दुनगहू (शेतकरी) पिंपळखुटा ता. जाफराबाद

***********************************************

"लॉकडाऊन मध्ये शेतकर्यां बरोबरच कलावंतचेही हाल होत आहेत. या काळात कुठेही कार्यक्रम होत नसल्याने कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.
     मायबाप सरकारने शेतकरी, कामगार, भूमिहीन शेतमजूर यांच्याबरोबरच कलावंतानाही न्याय द्यावा, ही विनंती."
- शाहीर अनिल भदर्गे (राष्ट्रीय पंचशिल कला पथक मंडळ) अकोलादेव ता. जाफराबाद.
*************************************************


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...