शुक्रवार, १५ मे, २०२०

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग लागल्याने जेन्टस पार्लर व पानटपरी जळून खाक.



मोबाईल शॉपी व जनरल स्टोअर्सचे ही मोठे नुकसान.



जाफराबाद/ प्रतिनिधी :- तालुक्यातील टेंभुर्णी येथे मंगळवारी मध्यरात्री विद्युत खांबावर झालेल्या स्पार्किंगमुळे लागलेल्या आगीत जेन्टस पार्लर व पानटपरी जळून खाक झाली असून, मोबाईल शॉपी व जनरल स्टोअर्सचे ही मोठे नुकसान झाले आहे.

     सविस्तर माहिती अशी की, टेंभूर्णी बस स्थानक परिसरातील साई जेन्टस पार्लर मागे असलेल्या विद्युत खांबावर मध्यरात्री स्पार्किंग होऊन त्याचे गुल पत्रावर पडले. पत्रावर झाडाचा पालापाचोळा पडलेला असल्यामुळे आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण करून येथील अरुण जाधव यांचे साई जेन्टस पार्लरला कवेत घेतले. यातील महागड्या खुर्च्या, फर्निचर, फॅन, इन्व्हर्टर व महागडी लोशन क्रिम अशा अडीच लाखाच्या वस्तु जळून खाक झाल्या. तसेच यांच्या बाजूला खेटूनच असलेल्या तस्लिम पठाण यांच्या पानटपरीतील फ्रिज व अन्य वस्तु असा ३५ हजारांचा ऐवज तर जाकेर पठाण यांच्या मिलन मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल, जनरल वस्तु व फर्निचर असा अडीच ते तीन लाखांचा माल जळून खाक झाला आहे. सुरेश साळुंके यांच्या व अन्य एका टँकर मधील पाण्याद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न यावेळी उपस्थितांनी केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते.
     तलाठी राम धनेश व पोलीस जमादार श्री. गवळी यांनी (दि. १३) बुधवार रोजी पंचनामा केला.

 प्रतिक्रिया :-
-----------------------------------
२२ वर्षा पूर्वी ही आगीने नुकसान.

अरुण जाधव यांच्या जेन्टस पार्लरला २२ वर्षा पूर्वी नोव्हेंबर १९९८ ला ही आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. आता पुन्हा स्पार्किंगमुळे आग लागून संपूर्ण दुकान बेचिराख झाल्याचे सांगताना ते भावुक झाले होते. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन असल्यामुळे २ महिन्यापासून सर्व दुकाने बंद असल्यामुळे आर्थिक कोंडी झालेली आहे. लॉकडाऊन संपल्यावर नव्या उमेदीने दुकाने सुरू करू या आशेवर असणार्या दुकानदारांची पार निराशा झाली आहे. स्पार्किंगमुळे आमच्या व्यवसायाचे होत्याचे नव्हते झाले असून प्रशासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी अरुण जाधव, जाकेर पठाण व तस्लिम पठाण यांनी केली आहे.
-----------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...