सोमवार, २२ जून, २०२०

ॲन्टीजन टेस्टींग,  टेलिएक्सरे तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करा जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता -- पालकमंत्री राजेश टोपे



जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असुन ही अतिशय चिंतेची बाब आहे.  जिल्ह्यातील रुग्णांसाठी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन ॲन्टीजन टेस्टींग,  टेलिक्सरे तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात यावेत.  जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री टोपे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री नार्वेकर, डॉ. जगताप आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असुन केवळ अर्ध्या तासामध्ये रुग्णाचा अहवाल देणाऱ्या ॲन्टीजन्ट या तंत्रज्ञानाबरोबरच टेलिएक्सरे ही सुविधाही जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली असुन या तंत्रज्ञानाचा  प्रभावीपणे वापर करण्यात यावा.  तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींगसुद्धा करण्याचे निर्देश देत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची, आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग हा कंन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करुन या भागातुन एकही नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. या भागात नियम अधिक कडकपणे लागू करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला यावेळी दिल्या.तालुका आरोग्य अधिकारी तसेच आशा वर्कर्स यांनी पॉलीऑक्सीमीटरचा वापर करुन घरोघरी जाऊन मधुमेह, ऱ्हदयरोग असे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती व ज्यांना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आहे अशा व्यक्तींचे जलदगतीने सर्व्हेक्षण करण्यात येऊन आवश्यकतेनुसार संस्थात्मक अलगीकरण करण्याबरोबरच वेळप्रसंगी अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.शहरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये राहणारे नागरिक एकाच शौचालयाचा वापर करतात.  या शौचालयाच्या माध्यमातुनसुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने शौचालये नियमितपणे स्वच्छ करण्याचे निर्देश देत हायपोक्लोराईड द्रव्याने निर्जंतुकीकरणाची कार्यवाही नगरपालिकेने करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.  कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत जनमानसांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत  कोरोनासंदर्भात छोटछोटे व्हिडीओ, कार्टुन्सची निर्मिती करुन समाजमाध्यमे, विविध वाहिन्या, वृत्तपत्रे याद्वारे जनमानसांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...