शनिवार, २८ मार्च, २०२०

कोरोना विषाणुच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे शोध,तपासणी व उपचार या बाबींवर भर द्यावा नागरिकांनी घरामध्येच राहुन प्रशासनास सहकार्य करावे-पालकमंत्री राजेश टोपे
जालना, प्रतिनिधी – कोरोना विषाणुचा संपुर्ण जगात प्रादुर्भाव होत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यामध्ये 
कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही. हा आजार संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यामध्ये रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार (Tracing,Testing,Treatment) या बाबींवर भर देण्याची गरज आहे.  या विषाणुचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत नागरिकांनीही घराबाहेर न पडता घरात राहूनच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजने संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी पालकमंत्री  श्री टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ. एम.के.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नसला तरी जे परदेशातुन व अथवा परराज्यातुन व परजिल्ह्यातुन आलेले नागरिक आहेत या सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी व त्यानंतर उपचार करण्यात यावेत. आरोग्य यंत्रणेने गतीने व अचुकतेने काम करण्याची गरज आहे.  ग्रामीण भागात आशा वर्कसना संपुर्ण प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये व शहरांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईड या द्रव्याची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घेण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात एच२ओ२ या द्रव्याची फवारणी करण्यात यावी.
कोरोषा विषाणुचा मुकाबला करण्यासाठी पैसा, मनुष्यबळ तसेच साहित्यसामुग्रीची कमतरता भासु दिली जाणार नसल्याचे सांगत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन 5 टक्के निधी राखीव ठेवला असुन यामधुन 12 कोटी १० लक्ष रुपये तर आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातुन 60 लक्ष असे एकुण 12 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध असुन या निधीतुन एन-95 मास्क, पीपी किट, ट्रिपल लेअर मास्क, सॅनिटायजर तसेच व्हँटीलेटरर्सच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.  तसेच या कामासाठी सीएसआर फंडातुनही निधी उपलब्ध करुन घेण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही परंतू पॉझिटीव्ह रुग्णांची येत्या काळात संख्या वाढल्यास अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी जालना जिल्ह्यात स्वतंत्र अशा 100 खाटांच्या कोरोना रुग्णालयाची उभारणी करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यामध्ये  परदेश, परराज्य, परजिल्ह्यातुन आलेल्या व सर्दी, खोकला व ताप आहे काय याबाबत आरोग्य यंत्रणेमार्फत 2 लाख 62 हजार कुटूंबांचा सर्व्हे करण्यात आला असुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. गावनिहाय रॅपीड ॲक्शन टीमची स्थापनासुद्धा करण्यात आली असुन ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आवश्यक तज्ज्ञांची भरती करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची दवाखाने बंद असल्याच्या अनेक तक्रारी येत असुन त्यामुळे नागरिकांना साध्या आजारवर उपचार घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांची दवाखाने सुरु करुन नागरिकांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.  जे व्यावसायिक सेवा देण्यास असमर्थ ठरतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तु मिळतील यासाठी दक्षता घेण्याच्या सुचना करत स्वस्त धान्य दुकानदारांनी पुढील सहा महिन्यांचे एका महिन्यात दोन महिने याप्रमाणे पुढील तीन महिने अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात यावे.  परंतु हे करत असताना त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर समाजातील जे गोरगरीब, भिकारी किंवा ज्यांना कोणीही नाही अशांना भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात यावी.  केवळ दहा रुपयांमध्ये भोजन देणाऱ्या शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्यात यावी  राज्यातील रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता असुन प्रत्येक तालुकास्तरावर रक्तदान शिबीरांचे आयोजन रक्त संकलन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.देशासह राज्यावर कोसळलेल्या या राक्षसरुपी संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज असुन नागरिकांनी आपल्या घरातच राहुन या आजारावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्री महोदयांना दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...