बुधवार, २० मे, २०२०


               लॉकडाऊन आणि लोकजीवन



लॉकडाऊन हा शब्द हल्ली आपणा सर्वांच्याच अगदी जवळून परिचयाचा झाला आहे. या पूर्वी ही भारताच्या अनेक भागात लोकडाऊन झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु संपूर्ण देशभर एकावेळी चाळीस दिवसापेक्षा अधिक सर्वत्र लोकडाऊन  झाल्याचे इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.  विशिष्ट काळ प्रशासनास काही अल्पकाळापूरते लोकडाऊन करावे लागत असे. परंतु त्या-त्या भांडण तंटे झालेल्या,तेढ उदभवलेल्या भागापूरते मर्यादित काळासाठी लॉकडाऊन करून परिस्थिती नियंत्रणात आणली जात असे. काही विशिष्ट काळानंतर समाजाचा गाडा पुन्हा पूर्ववत होत असे. परंतु इतिहासात प्रथमच गेल्या चाळीस दिवसापेक्षा अधिक दिवस संपूर्ण देश बंद आहे.
     सामाजिक तेढ ही काही काळ चालत असे .काही विशिष्ट काळानंतर अल्पावधीतच आपापसातील मतभेद विसरून परस्परातील वाद सामोपचाराने आणि प्रशासनाच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे ही भांडणे मिटून समाज गुण्यागोविंदाने नांदत असे. पण आजचे हे लोकडाऊन वेगळ्या स्वरूपाचे आहे. दृष्टीस अगोचर असणाऱ्या एका सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणू च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात एकाच वेळी लोकडाऊन लागू करण्यास शासनास भाग पडले आहे. या कोरोना अर्थात कोविड-१९ याविषाणूची भयानकता किती आहे हे वेगळ्याने सांगणे नको. गेल्या दीड महिन्यापासून आपण सर्वजण ती अनुभवतोय. या विषाणूचा संसर्ग गुणाकार पद्धतीने होऊन जो संपर्कात येतो त्याला तो संसर्ग करतोय.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे शेकड्यांमधून हजारात केंव्हा पोहचले हे कळले सुद्धा नाही.
सुरुवातीस अत्यंत किरकोळ समजल्या गेलेल्या  विषाणूने  हळूहळू सारे जग हादरवून सोडले.आणि त्यातूनच आपल्याला दिवसेंदिवस त्याचे गांभीर्य समजले. म्हणूनच तुम्ही आम्ही घरात थांबून आज या शत्रूशी लढतोय. संपूर्ण जगावर जरी या कोरोनाचा विळखा असला तरी  आवश्यक ती खबरदारी घेतल्यास,  केंद्र व राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन केल्यास, घरात बसून आपण या शत्रूशी यशस्वीपणे लढा देऊ शकतो.म्हणून घरात थांबणे व बाहेरच्या कोणाशीही संपर्कात न येणे हीच यावरची महत्वपूर्ण खबरदारी आहे.जगातील बलाढ्य राष्ट्राच्या तुलनेत आपल्या भारत देशाने या कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूशी बऱ्यापैकी सामना करुन तुमचे आमचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य शासनाने केले आहेत.सुरूच आहेत आणि भविष्यात ही ते सुरू राहणार आहेत. या कठीणसमयी प्रशासनास सहकार्य करण्याचे काम तुमचे आमचे आहे.मागच्या दीड महिन्यापासून आपण शासनास सहकार्य करतोय. पुढचे काही दिवस आपल्याला हे सहकार्य शासनास करून कोरोनावर विजय मिळवायचा आहे.
     मागच्या काही दिवसांपासून आपण घरात आहोत.  घरात बसून रहाणे हे वाटते तेवढे सोपे नाही. हे प्रत्यक्ष अनुभवानेच आपणा सर्वांना उमजले आहे.घरातील बैठक,किचन,बेडरूम, आणि घराची गॅलरी हेच मध्यमवर्गीय माणसाचे विश्व बनले आहे. मुंबई,पुणे,औरंगाबाद,नागपूर आशा शहरातील झोपडपट्ट्या मधून राहणारे,पोटासाठी वणवण भटकणारे, कुठेतरी पालं ठोकून वास्तव्य करणारे,उड्डाणपुलाच्या आश्रयाला राहणारे एकूणच दरिद्र्याने पछाडलेल्या बिचाऱ्या दीन-दुबळ्यांची तर कल्पनाच करवत नाही.कसे जगत असतील?काय खात असतील? कसे राहत असतील? याची कल्पना केली तरी मन हेलावते, डोळे पाणावतात.
     पोटासाठी मुंबई,पुण्यास आलेले व दोन-दोन हजार किलोमीटरच्या पायी प्रवासास लेकरा बाळांना खांद्यावर घेऊन निघालेले परप्रांतीय टी. व्ही.वर पाहिल्यास पोटात कालवते. सामान सुमानांची डोक्यावरची ओझी घेऊन वाटेला लागलेली ही माणसं गावाकडे कधी पोचतील या विचाराने मन सुन्न होतं.
आज घडीला लोकडाऊन चा हा तिसरा टप्पा सुरू आहे. आपणा सर्वांच्याच बाबतीत पहिला टप्पा बऱ्यापैकी वाचन,लेखनात,पाककृती बनवण्यात गेला.पुरेशी झोप घेण्यात गेला.  ताण तणाव या काळात तुलनेने कमी जाणवला.दुसऱ्या टप्प्यात वाचन,लेखन,पाककृती, खाण-पान बऱ्यापैकी चालू राहिले.आज रोजी सुरू असणाऱ्या या तिसऱ्या लोकडाऊन च्या टप्प्यात मात्र ,काहीशी झोप,मोबाईल, चित्रपट पाहणे,मोजक्या वेळ बातम्या पाहण्यात वेळ खर्ची होत आहे. शासनास सहकार्य करायचे आहे या विचाराने लोक घरात थांबून सहकार्य करत आहेत. ही खरोखर अभिनंदनीय बाब आहे
      प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात.नव्हे तर त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोक डाऊन मुळे संपूर्ण देश आणि जगाच्या बहुतांश भागात लोक घरात राहूनच या शत्रूशी लढा देत आहेत. तेव्हा अर्थव्यवस्था कोलमडणार हे 'उघड सत्य' आहे. हे सत्य जरी 'उघड सत्य' असले तरी 'जान है तो जहान है' या हिंदी सुवचना प्रमाणे आपला जीव आपणा प्रत्येकाला प्रिय आहे. 'शीर सलामत तो पगडी पचास' या हिंदी वचनाप्रमाणे आपणा सर्वांचे जीव रुपी 'शीर' सलामत अर्थात शाबूत रहावेसे वाटत असेल तर राज्य आणि केंद्र शासनाच्या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या आवाहनांना प्रतिसाद देऊन, उद्याच्या आपणा सर्वांच्या निरामय निरोगी आणि उज्वल भविष्यासाठी घरात थांबणे हेच सर्वांच्या हिताचे आहे.ही गोष्ट गांभीर्याने समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. लोकडाऊनचा काळ अनेकांच्या प्रतिभेस पंख देणारा ठरला आहे.एकांतातच कविता स्फुरते, लेख स्फुरतात. चित्रे प्रकटतात, कंठातून गाणी बाहेर पडतात. हा एकांत आम्हाला या काळात पुरेसा लाभल्याने  आमच्यात सुप्तपणे वास्तव्यास असलेला आणि आजवर आमच्यात दडून राहीलेला  लेखक-कवी,संगीतकार,गीतकार,चित्रकार  लेखक कवी खऱ्या अर्थाने उदयाला आला. मोबाईल, लॅपटॉप,टॅबच्या या काळात वाचन संस्कृती लयाला जाते की काय अशी भीती वाटत होती; पण कपाटातील धूळ खात पडलेल्या कथा, कादंबऱ्या, चरित्रे' आत्मचरित्र, वाचतांना लोक डाऊन ची टप्पे आम्हाला सुखकर गेली, घरातील सदस्यांचा परस्पराशी असणाऱ्या अबोला काही प्रमाणात का होईना कमी झाला. आपापसात चर्चा, संवाद घडू लागला. संध्याकाळच्या चार चा 'चहा' घेण्यास कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन गप्पात रंगून गेली. घरातील अडगळीच्या खोल्या यानिमित्ताने स्वच्छ आणि धुळविरहित झाल्या. अंगणातील परसबाग तन-वीरहित झाली. घरांची गच्ची मॉर्निंग आणि इविनिंग वॉकच्या पावलांनी गजबजून गेली. घरांच्या गॅलरीतील दुर्लक्षित कुंड्या व त्यातील रोपट्यांना पाणी मिळू लागली. गॅलरीत उभे राहुन समोरच्या शेजारच्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा वाढल्या.  प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा 'इगो' काही अंशी का होईना कमी झाला. कदाचित कमी झाला ही नसेल परंतु  वाढण्यापासून वाचला, हे मात्र नक्की. अधून मधून मनात क्षणभर  भविष्याचा विचार येतो. त्यातून अनेकजण दुःखी होतात. परंतु दुसऱ्याच क्षणी 'चोच देणाराच दाणेही देतो' या विचाराने पुन्हा तुम्ही-आम्ही सावरतो. शेवटी संकटे ही जाण्यासाठीच येत असतात. या संकटास विवेकबुद्धीने, धीराने,संयमाने सामोरे जाणेच हिताचे असते.आज ना उद्या ही संकटे जातीलच आणि उद्याची आनंदी सोनेरी पहाट उजाडेल यावर तुमचा-आमचा दृढ विश्वास आहे.शेवटी एकच सांगावेसे वाटते  कोरोनाशी लढूया,घरातच थांबुया.......

माधव अरुणराव डाके सहशिक्षक-राजस्थानी माध्यमिक विद्यालय,सहयोगनगर,बीड मो-9730115620

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...