रविवार, २८ जून, २०२०

घडीपुस्तिकेचे रोहयो मंत्री श्री भुमरे यांच्या हस्ते विमोचन रोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे


जालना,ब्युरोचीफ :- रोजगार हमी योजना विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड विषयी योजनांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे विमोचन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते अंबड तालुक्यातील पाहणी दौऱ्याप्रसंगी करण्यात आले. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाने योग्य रीतीने पार पाडण्याबरोबरच योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन रोहयो मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी केले. यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.घडीपत्रिकेमध्ये दि. 12 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयानुसार मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत व दि. 30 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीमार्फत रोपवन संरक्षण व संगोपनाबाबत (बिहार पॅटर्न) विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  तसेच मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्यासाठी पात्र लाभार्थी, वृक्षलागवड करण्यायोग्य प्रजाती, वृक्षलागवड मुदत, कलमे/रोपे पुरवठा तसेच लाभार्थ्यांची जबाबदारी इ. विषयी  व ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या रोपवणाचे संरक्षण, देखभाल व संगोपन विविध पद्धतीने करून जिवंत रोपांची टक्केवारी वाढविण्याचा शासनाचा उद्देश असून संगोपनाचा कालावधी, कुटुंबाच्या गटाची निवड व त्यांची कामे,  मजुरीचे निकष, रोजगाराची गणना आदीविषयी  घडीपत्रिकेमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेकडून संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी तसेच विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, जालना यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...